मुंबई: भाजप आणि शिवसेना यांच्यातील पोस्टर वॉर पुन्हा एकदा पेटले आहे. मुंबई महानगपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेले हे पोस्टर वॉर पुढे काय चित्र आणेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या बोलण्याची खिल्ली उडवणाऱ्या पोस्टरवरुन आता शिवसेना-भाजपमध्ये वातावरण तापलं आहे. यावरून आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘चिल्लर लोक चिल्लरपणा करणार, अशा शब्दांत कुणाच्याही नावाचा उल्लेख न करता केला. (हे पण वाचा: मुंबईत पोस्टरच्या माध्यमातून उडवली किरीट सोमय्यांची खिल्ली)

आज गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी आशिष शेलार यांनी रंगशारदा सभागृहात उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार अशी घोषणा खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. यानंतर सोमय्या यांची खिल्ली उडवणारं पोस्टर काल भाजप प्रदेश कार्यालयासमोर लावलं होतं.

त्यानंतर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “कोणत्याही पक्षाने त्या पोस्टरखाली नाव लिहिण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं कितपत योग्य ठरेल, हा प्रश्न आहे. पण चिल्लर लोक चिल्लरपणा करणार, त्याला आम्ही बाजूला ठेवतो.”

मात्र याच कार्यक्रमाच्या ठिकाणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. किरीट सोमय्यांची खिल्ली उडवणारे पोस्टर कुणी लावले माहित नाही. आशिष शेलार काय म्हणाले, त्यांनी कोणता चिल्लरपणा केला, की आणखी कोणी केला, हे मला माहित नाही. पण आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ, असं वायकर म्हणाले.

किरीट सोमय्यांच्या व्यंगावर बोट ठेवत मुंबईतील नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर ‘बीदेपी त्वबलावल ललणाल- टिलित सोमैय्या’ अशा आशयाचे पोस्टर लावून त्यांच्या बोलण्याच्या शैलीची खिल्ली उडवण्यात आली आहे. हे पोस्टर कुणी लावले याची माहिती मिळू शकली नव्हती.