पुण्यातील कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा मंगळवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारला गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चाकण परिसरात ही चकमक झाली. यावेळी श्याम दाभाडेचा साथीदार धनंजय शिंदे हादेखील मारला गेल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तसेच गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

8

 पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून दाभाडेच्या शोधात होते. चाकणमधील वरसाई देवी डोंगर परिसरात श्याम दाभाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी श्याम दाभाडे आणि त्याच्या साथीदाराला वेढा घातल्यानंतर शरण यायला सांगितले. यावेळी दाभाडेने पोलिसांवर ९ राऊंड फायर केले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी ५ राऊंड फायर केले. त्यात गुंड श्याम दाभाडेसह त्याचा साथीदार धनंजय शिंदेही ठार झाला. श्याम दाभाडेकडे ४ पिस्तूल, एक कट्टा आणि ४२ राऊंड्स मिळाले.

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात गुंड श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता. सचिन शेळके यांच्या हत्येसह श्याम दाभाडेवर आणखी ३ हत्येचे गुन्हे, ३ हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, तसेच खंडणी आणि दरोडा असे एकूण २२  गुन्हे पुण्यासह राज्यातील अनेक शहरात दाखल आहेत. तळेगाव, मावळ परिसरात गुंड श्याम दाभाडेची प्रचंड दहशत होती.

Image Credit : ABP Majha, Getty Image