मुंबई – मुंबईतील रस्त्यांची आणि फुटपाथची दुरावस्था तुम्ही पाहिली असेलच यावरुन राजकारणी एकमेकांवर टीका करतानाही तुम्ही पाहिलं असेलच. मात्र, मुंबईतील रस्त्यांच्या आणि पदपथांच्या दुरावस्थेवरुन स्वत: मनपा आयुक्त अजोय मेहता यांनीच आता मौन सोडल्याचं पहायला मिळालं. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत असताना म्हटले की, पदपथांची अवस्था बघून आई – वडिलांना बाहेर फिरायला न्यायची भीती वाटते.

एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील रस्त्यांची आणि फुटपाथच्या अवस्थेवर भाष्य करताना मनपा आयुक्त अजोय मेहता यांनी म्हटले की, फुटपाथच्या बिकट अवस्थेमुळं माझ्या वृद्ध आईवडिलांना बाहेर फिरायला न्यायला भीती वाटते. माझ्या वॉर्ड ऑफिसरला मी सांगतो की एकदा तुमच्या आई वडिलांना फुटपाथवरुन चालायला घेऊन जा आणि मग मला सांगा फुटपाथची काय अवस्था आहे?. आयुक्तांनीच हतबलता व्यक्त केल्याने सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (हे पण पाहा: मुंबईत गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना ट्रकने उडवले)

मुंबईतील रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले असुन निवडणुकीपूर्वी शहरातील सर्व रस्ते चांगले करु असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. मनपा आयुक्तांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत भाष्य केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने अजोय मेहता यांच्यावर टीका केली आहे. अजोय मेहता यांच्या विधानावर महापालिकेतील शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आयुक्तांकडेच बोट दाखवत म्हटले आहे की, आयुक्तांकडे अधिकार आहेत.