मुंबई: राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. आता सर्वांच्या नजरा मुंबई महापालिकेच्या निवडणूकांकडे लागले असून भाजपने ही निवडणुक स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. आज शिवसेनेचे दोन महत्वाचे नेते शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे हा शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर आणि बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा शिवसेनेला मिळालेला मोठा धक्का आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीची कोणतीही चर्चा अजून झाली नाही. त्यामुळे त्यामुळे युतीचं चित्र अजूनही स्पष्ट नाही. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते भाजपमध्ये जात असल्याने युतीही धोक्यात असल्याचे चित्र आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत गंभीर आणि गणाचार्य यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गंभीर हे गेल्या काही दिवसांपासून कोणतीही महत्वाची जबाबदारी न दिल्याने पक्षावर नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर गणाचार्य यांना शिवसेनेने गेल्या पंधरा वर्षांपासून बेस्ट समितीत स्वीकॄत सदस्य म्हणून घेतले होते. आता ते भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेला फटका बसणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी अशाप्रकारे पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी शिवसेना काय पाऊल उचलते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. यासोबतच आपल्याच मित्र पक्षात त्या नेत्यांनी प्रवेश केल्याने शिवसेना भाजपवर काही टीका करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.