ठाणे – काळा पैसा, भ्रष्टाचार, अवैध संपत्ती याविरोधात लढा उभारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच, नोटाबंदीवर पर्याय निर्माण करत सर्व व्यवहार रोखमुक्त करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या मोहिमेत सहभागी होऊन नोटाबंदीवर पर्याय निर्माण करणारा आणि सगळे व्यवहार रोखमुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे. यानुसार, ठाणे जिल्‍हयातील धसई गावात १ डिसेंबरपासून सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने सुरु करण्यात आले आहेत.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये धसई गावात कॅशलेस सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील धसई हे गाव केवळ राज्यातीलच नाही तर देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून समोर आले आहे. (हे पण पाहा: नोटाबंदीनंतर मुरबाड तालुक्यातील धसई गाव बनणार देशातील पहिले ‘कॅशलेस’ गाव)

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, धसई गाव हे देशातील पहिले कॅशलेस गाव झाले असुन ही गोष्ट माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. धसई गावाप्रमाणेच येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील इतरही गावांतील आणि शहरांमधील व्यवहार हे कॅशलेस पद्धतीने होतील यावर भर दिला जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील धसई गावातील हा कॅशलेस उपक्रम केवळ राज्यासाठीच नाही तर संपुर्ण देशासाठी एक प्रेरणादायी आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:चे डेबीट कार्ड वापरून तांदूळ खरेदी करत कॅशलेस गाव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.