कोल्हापूर: मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये घरफोड्या करून नागरिकांच्या नाकी नऊ आणलेल्या चड्डी बनियान गँगला जेरबंद करण्यात आलं आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या कारवाई ही टोळी पकडण्यात आली आहे. या टोळीने संपूर्ण राज्यभरात 400 घरफोड्या केल्याचा पोलिसांचा संशय असून गेल्या सहा महिन्यात त्यांनी कोल्हापूर जिल्हयात 60 घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार. चड्डी-बनियान गँग नावाची ही टोळी उस्मानाबाद जिल्हयातील इटकूर या गावची आहे. यातील चौघांना अटक केली आहे. तर टोळीचा म्होरक्या विलास छना शिंदे याच्यासह सहाजण फरार आहेत. अटक केलेल्या चौघांकडून अमेरिका, सिंगापूर, भूतान, चीन आणि थायलंड या देशांचे चलन सापडले आहे. तसेच 1 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या टोळीनं 1 नोव्हेंबर 2016 पासून ते मे 2017 या कालावधीत कोल्हापूर जिल्हयात सुमारे 50 हून अधिक घरफोड्या झाल्या होत्या. उस्मानाबाद जिल्हयातील एका विशिष्ट समाजाचे लोक असे प्रकारचे गुन्हे करण्यात तरबेज असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याप्रमाणे उस्मानाबाद येथे पोलिसांच्या पथकाने येथील एका वसाहतीवर छापा टाकला. यावेळी संशयित दत्ता काळे, रामेश्वर शिंदे, राजेंद्र काळे व अनिल काळे या चौघांना ताब्यात घेतलं.