मुंबई: ‘मी जीवंत आहे तोपर्यंत माझे निर्दोषत्व सिद्ध व्हावे. पण, मी जर त्या आधीच मृत्युमुखी पडलो तर, लोक मला दोषीच समजतील. म्हणूनच माझी ईश्वराला विनंती आहे की, मी निर्दोष ठरे पर्यंत मला जिवंत ठेव’, असे भावनीक उद्गार राज्याचे माजी सार्वजनीक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी आज (सोमवार) काढले. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भुजबळ यांनी मतदान केले. यावेळी विधानभवनातून निघताना त्यांनी हे भावनीक विधान केले.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तगडे नेते म्हणून महाराष्ट्राला परिचीत आहेत. एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक असलेल्या भूजबळांनी कॉंग्रेस मार्गे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, सत्ता आल्यावर भुजबळ हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती. मात्र, आघाडीच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद कॉंग्रेसकडे गेल्यामुळे राष्ट्रवादीने भुजबळांना उपमुख्यमंत्रीपद दिले. दरम्यान, ते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीही राहिले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना भुजबळांच्या कारकिर्दीत  बांधल्या गेलेल्या ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणात भुजबळ गोत्यात आले.(हे पण पाहा: मुंडेंना संपवले, भुजबळांना संपवू देणार नाही: ओबीसींचा इशारा)

ईडीने अटक केल्यापासून भुजबळ गेली 16 महिने तुरूंगातच आहेत. सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्य़ांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना ईडीने अटक केली आहे.  भारतीय दंडसंहिता १९/१ अन्वये काळापैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. अटक झाल्यापासून भुजबळ हे जामीन मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचे अनेक जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांना अद्याप यश आले नाही.