मुंबई/नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातले मुख्य आरोपी छगन भुजबळ यांनीही राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान केले. एक आमदार म्हणून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क आपल्याला मिळावा, अशी मागणी भुजबळांनी न्यायालयाला केली होती. त्यामुळे त्यांना एक तासासाठी तुरुंगातून सोडण्यात आले होते. त्यांच्यासोबतच अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदम यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानासाठी आज त्यांना न्यायालयातून एक तास बाहेर काढून विधानभवनात मतदानासाठी आणण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं. (हे पण वाचा: राष्ट्रपतीपदासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी केले मतदान)

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदानासाठी जेलबाहेर आले आहेत. या दोघांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु द्यावं, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. दरम्यान, भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात जेलमधून विधानसभेत मतदानासाठी नेण्यात आलं. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलकडे नेण्यात येईल.

एनडीएकडे शिवसेनेची मिळून 5 लाख 37 हजार 683 मतं आहेत, मात्र बहुमतासाठी आणखी 12 हजार मतांची त्यांना गरज भासणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. आज मतदान पार पडल्यानंतर 20 जुलैला मतमोजणी होईल, तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला राष्ट्रपतीपदी विराजमान होतील.