मुंबई – नारायण राणे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी पून्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. नितेश राणे यांनी एक रेखाचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. नितेश राणे यांनी एक रेखाचित्र ट्विट केलं असून या रेखाचित्रात उद्धव ठाकरेंची तुलना ‘गजनी’ सिनेमातील आमिर खानसोबत केली आहे.

तुम्ही गजनी सिनेमा पाहिला असेलच. या सिनेमात ज्याप्रमाणे अभिनेता आमिर खानच्या शरीरावर विविध शब्द गोंदवून ठेवलेले असतात अगदी त्याचप्रमाणे या रेखाचित्रात उद्धव ठाकरेंच्या शरीरावर काही शब्द गोंदविल्याचं दाखविण्यात आलं आहे. इतकेच नाही तर नितेश राणे यांनी या रेखाचित्राला ‘महाराष्ट्राचा गजनी’ असे नावही दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांची अवस्था झाल्याचे नितेश राणे यांनी रेखाचित्राच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सुचवल्याचं दिसत आहे. ‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध,’ ‘जीएसटीला विरोध,’ ‘कर्जमाफीला विरोध,’ ‘मी सत्तेत आहे,’ आणि ‘समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे,’ अशा गोष्टी नितेश राणे यांनी रेखाटल्या आहेत. (हे पण पाहा: समृद्धी महामार्ग म्हणजे शिवसेनेची दुटप्पी भूमिका?)

गजनी सिनेमाता अभिनेता आमिर खानच्या डोक्यावर मार लागल्यानंतर तो आपली स्मरणशक्ती गमावतो अगदी तशीच परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाल्याचं नितेश राणेंनी या रेखाचित्रातून म्हटलं आहे.

आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली ही टीका पहिल्यांदाच केली आहे असे नाहीये. तर यापूर्वीही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना गजनी संबोधल्याने शिवसेना काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.