मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या 70 इमारतींना उंची कमी करा असे आदेश नागरी उड्डाण संचालनालयनं म्हटलं आहे. इमारतींची उंची कमी करण्यासाठी 60 दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या इमारती नवीन नसून यातील काही इमारती 50 वर्षाहून अधिक जुन्या आहेत.

उंची कमी करण्यासाठी सांगण्यात आलेल्या इमारती या विमानतळाशेजारील विलेपार्ले, सांताक्रूझ, घाटकोपर परिसरातील आहेत. या 70 इमारतींना जून महिन्यात नागरी उड्डयन संचालनालयाचे नोटीस बजावली होती. जुन्या इमारतींमधील रहिवाशांकडे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून या इमारतींना ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आलं असताना या नोटीस देण्यात आल्या आहेत.

जून महिन्यात याबद्दलचे आदेश संबंधित सोसायट्यांना देण्यात आल्या असून या इमारतींची उंची कमी करण्यासाठी 60 दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डयन संचलनालयाला विमानांच्या उड्डाणात अडथळा आणणा-या इमारतींची यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. ही यादी सादर केल्यानंतर या इमारतींना 1 ते 6 मीटर उंची करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हवाई वाहतूक महासंचालनालयनं दिलेल्या नोटीसमुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून काही नागरिकांवर बेघर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या इमारतींची उंची कमी करण्यासाठी पाडकाम करावं लागणार असुन या दरम्यान इमारती कोसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.