बारामती – ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सर्वजण आपल्याकडील जुन्या नोटा बँकेमध्ये जमा करण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र, असे असताना पुण्यातील बारामतीमध्ये तब्बल ६ कोटी ८९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा आहेत.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बारामती मार्गावरील भिगवण टोलनाक्यावर ही कारवाई केली आहे. जप्त केलेली रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असुन त्यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. (हे पण पाहा: मोदी सरकारमधील या मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक रोख रक्कम…)

काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिक आपल्याकडील जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी रांगा लावत आहेत. तर काहीजण आपल्याकडील काळा पैसा नियमित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवत असल्याचंही समोर आलं आहे.