नांदेड: मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार प्रदीप धोंडीबा पाटील यांच्या ‘गावकळा’ कादंबरीला वाचकांचे भरभरून प्रेम लाभले. या प्रेमामुळे मुळ मराठीत असलेली ही कादंबरी भाषेचे तट ओलांडून आता गुजरातीतही झळकणार आहे. अहमदाबाद येथील गुजराती साहित्याचे जाणकार आणि प्रसिद्ध अनुवादक किशोर गौड हे ‘गावकळा’चे गुजराती भाषेत भाषांतर करणार आहेत.

‘गावकळा’ प्रसिद्ध झाल्याच्या सुरूवातीच्या काळापासूनच या कादंबरीने रसिकांचे लक्ष्य वेधून घेतले. तसेच, मराठी साहित्य वर्तुळातील समिक्षक आणि अनेक नामवंत साहित्यीकांनीही या कादंबरीचे कौतूक केले आहे. साध्या, सोप्या मराठवाडी बोली भाषेचा वापर करत कादंबरी गावगाड्याचे चित्रण डोळ्यासमोर उभे करते. ग्रामिण भागातील कोणत्याही गावात अढळणारी इरसाल आणि अस्सल नमुनेदार पात्रे हे या कादंबरीचे विशेष वैशिष्ट्य. कोणत्याही गावात चांगल्या कामात अडथळा आणताना आढळणाऱ्या राघोबा मास्तर, अफण्णाजी खंडू, अप्पा गुरव, इंदर बनसोडे अशा खलनायकी पात्रा बरोबर सखा बापू, दाजीबा पाटील, रानबा पाटील, धनगराचा गोपू, सुमन, नागोजी, वसंता, रघू जमादार, बाबू कोळी, बबन कांबळे, देवबा अशी पात्र उभा करून गावगाडा उभा करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

सध्या जोरदार चर्चा असणाऱ्या हागणदारीमुक्त गाव या विषयावर चपकल भाष्य करणारी ही कादंबरी पुण्याच्या राजहंस प्रकाशनने प्रकाशीत केली आहे. लेखकाचे परिश्रम आणि प्रकाशनाचे नाव यांमुळे ही कादंबरी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या विवीध भागात पोहोचली आहे.

गुजराती भाषेत ही कादंबरी अनुवादीत करणाऱ्या किशोर गौड यांनी यापूर्वीही अनेक मराठी भाषेतील पुस्तकांचा गुजराती अनुवाद केला आहे. यात दया पवार यांचं ‘बलुतं’, डॉ. नरेंद्र जाधव यांचं ‘आमचा बाप अन् आम्ही’, रणजित देसाई यांचे ‘राधेय’,वीणा गवाणकर यांचं ‘भगीरथाचे वारस’ या प्रमुख पुस्तकांसह जवळपास मराठी भाषेतील साठच्या वर पुस्तकांचा समावेश आहे