मुंबई :  शनिवारी आणि रविवारी विकेंड एन्जोय केल्यावर आठवड्याचा पहिला वार ‘पाऊसवार’ झाला आहे.  सोमवारी सर्वांच्या दिवसाची सुरुवात पावसाने केली.  मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू राहिला. तसेच येत्या 24 तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यत हवामान खात्याने वर्तविली आहे.

गुरुवार ते शनिवार मनमुराद बरसलेल्या पावसाने सोमवारी सुट्टी घेतली होती. त्यानंतर पावसाचा जोर काही काळ कमी राहतो की काय असा अंदाज वर्तविला जात होता. पण नेहमीप्रमाणे सर्व अंदाज खोटे ठरवत सोमावर सकाळपासून जोरदार हजेरी लावली. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पडझडीच्या घटना घडल्या असून, सुदैवाने यात हानी झालेली नाही.

मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सकाळी 8.30 वाजण्याच्या नोंदीनुसार, शहरात २४.३५, पूर्व उपनगरात ६९.२१ आणि पश्चिम उपनगरात ४७.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वरळी, विले पार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाच्या सरी आहेत. दरम्यान, 24 तासांत मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. आतापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतूक सेवा सुरुळीत सुरू आहेत, वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

पावसात घडल्या काही घटना

शहरात एक, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी बांधकामांचा भाग पडला. शहरात सहा, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १६, पूर्व उपनगरात १८ आणि पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ५८ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही.

धरणे झाली ‘ओव्हरफ्लो’

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडकसागर धरण १५ जुलैला सकाळी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मोडकसागर धरणापाठोपाठ तानसा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. तानसा धरणात १२८.६३ मीटरपर्यंत पाणी साठवण्याची क्षमता आहे. १६ जुलै रोजी सकाळपर्यंत तानसा धरणात १२७.५७ मीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तानसा धरण भरायला फक्त एक मीटर बाकी आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसांत तानसा धरणही भरून वाहू लागणार आहे.