कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचं वृत्त समोर आलं आहे. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या दुर्गाडी किल्ल्याची दुरावस्था झाल्याने पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी रोवली. कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर दुर्गाडी किल्ला मोठया दिमाखात उभा असून हा किल्ला शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार आहे. मात्र, मागील काही वर्षात या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे.

पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे त्यामुळे आता दुर्गाडी किल्ला महापालिकेच्या ताब्यात देण्याचा मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गाडी किल्ल्याची दुरावस्था समोर येत आहे. पुरातत्त्व विभागाला या किल्ल्याची डागडूजी करणं जमत नसेल, तर हा किल्ला कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे द्या अशी मागणी राजेंद्र देवळेकर यांनी केली आहे.

ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यात सरकारचा पुरातत्त्व विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या तटबंदीच दगड ढासळू लागले आहेत.