अहमदनगर – कोपर्डी येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पीडित मुलीच्या स्मारकाच्या चौथ-यावर बसविण्यात आलेला पुतळा कुटुंबियांनी काढून घेतला आहे. पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. वाद वाढत असल्याचे लक्षात आल्याने निर्भयाच्या कुटुंबीयांनी शनिवारी हा पुतळा काढून घेतला आहे.

कोपर्डी येथे राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी निर्भयाचे स्मारक उभे केले होते. मात्र, यावर निर्भयाचा पुतळा बसवण्यापूर्वीच संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी निर्भयाचे स्मारक उभे करण्यास तीव्र विरोध केला होता. गुरुवारी रात्री स्मारकावर निर्भयाचा पुतळा कुटुंबीयांनी बसवला होता. या प्रकारामुळे तणाव निर्माण होऊ लागल्याने शुक्रवारी निर्भयाच्या नातेवाइकांनी पुतळा कापडाने झाकून टाकला. मात्र, निर्माण झालेला वाद वाढू लागल्याने अखेर कुटुंबीयांनी शनिवारी दुपारी हा पुतळा काढून घेतला.

भय्यूजी महाराज यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे आम्ही सर्व व्यथित झालो आहोत. समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी असाच भय्यूजी महाराज यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडू नये यासाठी आम्ही पुतळा काढून घरामध्ये ठेवत आहोत अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिली आहे. (कोपर्डी बलात्कार प्रकरणाला एक वर्ष पूर्ण, गावात गेले वर्षभर सण नाही)

माझ्या मुलीसाठी मराठा समाज एकत्र आला असून, त्याची आठवण म्हणून क्रांतीज्योत उभी करावी अशी भावना पीडित मुलीच्या आईने व्यक्त केलीय. संभाजी बिग्रेड मुलीच्या कूटूंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तिला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहोत असे संभाजी ब्रिग्रेडने म्हटले आहे.