मुंबई: अनेक असे लोक असतात ज्यांच्याकडे वेळेवर उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांना आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव गमवावा लागतो. अनेकांना पैशांअभावी उपचारही घेता येत नाहीत त्यामुळे आजार बळावतो आणि जगणं कठिण होतं. वेळ अशी असते ज्यापुढे कुणीही काही करू शकत नाही, असेच म्हणावे लागेल. मात्र अशाच काहींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहायता निधीचा पर्याय उपलब्ध आहे. ज्या माध्यमातून अनेकजण आपला किंवा आपल्या आप्तांचा जीव वाचवू शकतात.

गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री सहायता निधी अशाच अनेकांची मदत करत आहे. गेल्या दोन वर्षात या निधीच्या माध्यमातून राज्यातील तब्बल १० हजार २५० रूग्णांवर उपचार करण्यात आला आहे. उपचारासाठी पैसेच नसल्याने आजारपणासमोर गुडघे टेकून मरणाची वाट पाहणा-या व्यक्तींचे या निधीतून उपचार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना केली. त्यानंतर तब्बल १० हजार २५० रूग्णांवर उपचार करण्यत आले आहेत.

किती मिळते मदत?
आधी वैद्यकीय सहायता कक्षातून गरजूंना केवळ २५ हजार रूपये दिले जायचे. आता ही रक्कम वाढवण्यात आली असून ३ लाख रूपयांपर्यंतची मदत केली जाऊ शकते. मात्र त्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण करणा-यांनाच या सुविधेचा फायदा घेता येणार आहे.

कशी मिळवाल मदत?
ज्या कुटुंबाला मदत हवी आहे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असायला हवे. त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळतो. हे निकष पूर्ण करणा-यांनी तहसीलदाराकडून उत्पन्नाचा दाखला आणावा. त्यासोबतच आधार कार्ड, राशन कार्ड, संबंधित रूग्णालयाचे उपचाराचे खर्चाचे अंदाजपत्रक ही सर्व कागदपत्रे एकत्र करून प्रस्ताव पाठवावा लागतो. हा प्रस्ताव मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, ७ वा मजला, ब्लॉक नंबर ७१३, मुख्य इमारत, मुंबई – ४०००३२ या पत्त्यावर पाठवावा लागतो. गरज लक्षात घेऊन लगेच मदत केली जाते, असे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ०२२-२२०२६९४८ या क्रमांकावर संपर्कही करू शकता.