मुंबई – राज्यामध्ये असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच 27 महानगरपालिकांच्या नगरसेवकांसाठी आनंदाचा बातमी आहे. कारण, या नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे.

वाढत्या महागाईमुळे नगरसेवकांनी मानधनात वाढ करण्याची केलेली मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. मुंबईसह ‘अ+’ महापालिकांमधील नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये, ‘अ’ वर्ग महापलिकेतील नगरसेवकांना 20 हजार रुपये, ‘ब’ वर्ग महापालिकांमध्ये 15 हजार आणि ‘क’ वर्ग महापालिकांमध्ये 10 हजार रुपये इतके मानधन दरमहा दिले जाणार आहे.

27 महापालिकांमध्ये एकूण 2 हजार 700 हून अधिक नगरसेवक आहेत. लोकसंख्या, महसूल उत्पादन आणि इतर पायाभूत सुविधांच्या आधारे महापालिकांची अ+, अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली जाते. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात 2008 मध्ये तर इतर महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात 2010 मध्ये वाढ करण्यात आली होती. महागाई वाढल्याने मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. (हे पण पाहा: मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्ट रोजी होणार मतदान)

मुंबई या ‘अ+’ दर्जाच्या महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. पुणे आणि नागपूर ‘अ’ दर्जाच्या महापालिकेतील नगरसेवकांना 20 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक ‘ब’ दर्जाच्या महानगरपालिकेतील नगरसेवकांना 15 हजार रुपये, तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, वसई, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, मिरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड-वाघाळा, पनवेल, चंद्रपूर, परभणी, धुळे, अहमदनगर, अकोला, लातूर, मालेगाव, जळगाव, सांगली, मिरज, उल्हासनगर आणि कोल्हापूर या ‘क’ आणि ‘ड’ दर्जाच्या महापालिकेच्या नगरसेवकांना 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.