मुंबई – गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच सॅक धोरण राबविणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. राज्यात बीच सॅक धोरण तयार करण्याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

मदन येरावार यांनी सांगितले की, पर्यटकांना सागरी किना-यावर राहण्याचा आनंद घेण्याची मनस्वी इच्छा असते. बीच सॅक, हॅट्स, अंब्रेला इत्यादी सुविधा गोव्यात येणा-या पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अशा सुविधेला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असून त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.

तारकर्ली, शिरोडा-वेळागर, मुरुड-दापोली, गणपतीपुळे, अलिबाग, दिवे-आगार, आक्षी-नागाव, केळवा, बोर्डी इत्यादी ठिकाणी विस्तीर्ण समुद्र किनारे आहेत. याठिकाणी पर्यटकांना बीच सॅक, हॅट्स, अंब्रेला अशा सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता धोरण ठरविण्यासाठी नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र सागरी किनारा नियंत्रण (MCZMA), महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषधी विभाग या विभागांची समिती स्थापन करुन धोरण ठरविले जाईल, असेही मदन येरावार यांनी सांगितले.

बीच सॅक-बीच सॅक म्हणजे समुद्र किनारी तात्पुरत्या स्वरुपात बांबूच्या सहाय्याने तयार केलेली झोपडी होय. यामध्ये किचन, फर्निचर, टॉयलेट, फायर कव्हर, फर्स्ट एड (Fire cover/First Aid) इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. बीच सॅक सुविधा ही 1 सप्टेंबर ते 31 मे या कालावधीत पर्यटकांकरीता उपलब्ध करुन देण्यात येते.