रविवारी झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीतील विजयावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून ‘ आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएमसारख्या पक्षांशी ‘छुपे गटबंधन’ केले असते तर आमच्याही नगराध्यक्षांचा आकडा ‘सुजला’ असता. भाजपच्या विजयाचाही आम्ही सन्मान करीत आहोत, मात्र आकडा ही तात्पुरती सूज ठरू नये’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यातील मिनी विधानसभा म्हणून गणल्या गेलेल्या नगरपरिषदा निवडणुकीत ५२ नगरपालिकांमध्येभाजपाचे तर शिवसेनेचे २५ नगराध्य्क्ष निवडून आले. ‘ मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळेच हे दणदणीत यश मिळाले’ असा दावा भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव यांनी टीकास्त्र सोडत ‘ नोटाबंदी’च्या निर्णयाने खूश होऊन जनतेने भाजपचे ५० नगराध्यक्ष निवडून दिले असे सांगणारे मूर्ख आहेत. तसे असते तर भाजपचे किमान शंभर नगराध्यक्ष निवडून आले असते, पण तसे झाले नाही’ असा टोलाही हाणला आहे.

काय म्हटलंय सामनामध्ये?
विजय हा असा आहे! नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. निकालांचे विश्‍लेषण कमी आणि चिरफाडच जास्त होत असते. कारण सध्याच्या लोकशाहीत निवडणुका रणांगणावरील युद्धासारख्या लढवल्या जातात. त्या जिंकण्यासाठी व समोरच्याला गाडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीसह सर्वच आयुधांचा वापर केला जातो. त्यामुळे ज्याच्या हाती सत्तेच्या पाळण्याची दोरी तो सरस ठरतो हा नियम वर्षानुवर्षे सुरूच आहे. आमच्या दृष्टीने नगरपालिका निवडणुकांच्या निकालांचे हेच चिंतन आणि विश्‍लेषण आहे. फालतू चिरफाडीत आम्हाला रस नाही.

राज्यातील १४७ नगर परिषदा आणि १७ नगरपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. नगराध्यक्षपदाच्या निवडणुका ‘थेट’ मतदान पद्धतीने झाल्या. निकाल पाहता सत्ताधारी भाजप हा पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर व त्या खालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादीचा क्रमांक लागला आहे. ५२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. शिवसेनेचे २५ नगराध्यक्ष दणदणीत विजयी झाले आहेत व ही एक प्रकारे जोरदार मुसंडीच म्हणायला हवी. तीन नगराध्यक्षांवरून २५ नगराध्यक्ष निवडून येणे हे महत्त्वाचे आहे. दुसरे असे की, या निवडणुकांत स्थानिक पातळीवरील शिवसैनिकच एकांड्या शिलेदारासारखा लढत होता. ना आम्ही प्रचारात गेलो ना शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही तेथे पाठवले.

शिवसैनिकही सत्ता व पैशांच्या राजकीय दाबदबावाशी झुंज देऊ शकतो हा आत्मविश्‍वास आम्हाला जागवायचा होता व त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. शेवटी राजकारण म्हटले की जो तो आपापल्या सोयीच्या खेळ्या करतोच. उलट्यासुलट्या पलट्या मारून ‘डोकी’ वाढवून आकड्यांचा जुगार जिंकतो, पण शिवसेनेच्या यशाचे मोल असे की, नगराध्यक्षपदांचा ‘आकडा’ लावण्यासाठी आम्ही कोणत्याही राजकीय अनैतिक तडजोडी केल्या नाहीत. शिवसैनिकांना तशा स्पष्ट आदेशवजा सूचनाच होत्या. एक तर फक्त भाजपशी युती करा व जमत नसेल तर फालतू तडजोडी न करता एकटे लढा. कारण ज्यांच्यावर वरच्या पातळीवर भ्रष्टाचाराचे, राजकीय व्यभिचाराचे आरोप करायचे, त्यांना तुरुंगात पाठवायचे, याच मंडळींनी महाराष्ट्राची कशी वाट लावली असे जाहीर सभांतून बोलायचे व त्याच लोकांशी खाली अभद्र युत्या व तडजोडी करून कार्यकर्त्यांचा अवसानघात करायचा हे धोरण आम्ही राबवले नाही. त्यामुळे शिवसेनेचा विजय पवित्र आणि निर्मळ आहे. शुद्ध बावनकशी सोन्यासारखा चकाकणारा आहे.

आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएमसारख्या पक्षांशी ‘छुपे गटबंधन’ केले असते तर आमच्याही नगराध्यक्षांचा आकडा ‘सुजला’ असता. अर्थात शेवटी राजकारण हे साधुसंतांचे नाहीच व जुन्या नोटा बाद ठरवल्या असल्या तरी राजकीय डावपेचांच्या जुन्या नोटा कधीच बाद होत नाहीत. भारतीय जनता पक्षाचे अनेक बालेकिल्ले पडले आहेत. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांना धक्के बसले आहेत. मालवणात राणे तर कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना हादरे बसले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना बसलेले फटके हेच राज्याचे जनमानस आहे. मुख्यमंत्र्यांनी पन्नासच्या वर सभा घेतल्या. तरीही भाजपला मिळालेले यश मर्यादित आहे व विदर्भाने पाठबळ दिल्याने आजचा आकडा दिसत आहे.

महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, निवडणूक खर्चाकरिता निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांना पक्षाकडून निधी देण्यात आला होता. त्याची काही रक्कम जुन्या नोटांच्या माध्यमातून पालिकांमध्ये भरण्यात आली. त्याचा भाजपला फायदा झाला. भाजपच्या मतदारांना करमुक्त करण्याच्या मोहिमेवर अनेकांनी बोट दाखवले होते. पण शेवटी व्हायचे ते झालेच. असे जे आरोप सुरू आहेत त्यावर आता मुख्यमंत्र्यांनाच उत्तर द्यावे लागेल. ‘नोटाबंदी’च्या निर्णयाने खूश होऊन जनतेने भाजपचे ५२ नगराध्यक्ष निवडून दिले असे सांगणारे मूर्ख आहेत. तसे असते तर भाजपचे किमान शंभर नगराध्यक्ष निवडून आले असते, पण तसे झाले नाही. शिवसेनेचा विजय निर्भेळ आहेच, पण भाजपच्या विजयाचाही आम्ही सन्मान करीत आहोत. फुगलेला आकडा ही तात्पुरती सूज ठरू नये. सुज्ञास अधिक काय सांगावे?