मुंबई: नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुक निकालानंतर जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परिने प्रतिक्रीया दिल्या आहेत. विश्लेशनही केले आहे. त्यापैकी काही प्रितिक्रीयांमध्ये टीका काहीत विरोधाभास काहींत आत्मपरिक्षण तर काही प्रतिक्रीयांमध्ये थेट आपल्याच पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल पहायला मिळत आहे. या निवडणुक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मामला उलटापाटलाट झाला आहे. म्हणूनच जाणून घ्या कोण काय म्हणाले…

राज ठाकरे – भाजपचा विजय नोटाबंदीमुळे नव्हे तर जुन्या नोटांमुळे : नगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून भाजपच्या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा विजय हा नोटा बंद केल्यामुळे नाही तर जुन्या नोटांमुळे झाला असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –  शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे भाजपचा विजय : छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि राज्यातील विकास कामांवर जनतेने दाखवलेला विश्वास यामुळेच भाजपला विजय मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

खा. उदयनराजे, सातारा – मी बारामतीच्या दावनीला बांधलेला नाही: मी बारामतीच्या दावनीला बांधलेला नाही असे म्हणत उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे पवारांवर निशाणा साधला. माझ्या बंधुंनी याचा विचार करावा असेही ते म्हणाले. सातारा विधानपरिषदेचा पुढील आमदार माझा भाऊ नाही तर सर्वसामान्य घरातील असेल असा इशाराही उदयनराजेंनी दिला. (हेही वाचा, महाराष्ट्र भाजपचे पंतप्रधान मोदींकडून कौतूक, जनतेचही मानले आभार)

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता – परळीत धनशक्ती आणि नेत्यांच्या फौजा वापरूनही भाजपचा पराभव: परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने धनशक्ती आणि नेत्यांच्या फौजांचा वापर करूनही जनशक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजून कौल दिला, याठिकाणी विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी याठिकाणी जोरदार प्रचार केला होता. मात्र, सरतेशेवटी परळीची जनता काम करणाऱ्या पक्षाच्याच पाठीशी उभी राहिली, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

नारायण राणे –  वशिल्याने पदं वाटणं बंद केल्याशिवाय कॉंग्रेसला यश नाही: कॉंग्रेस पक्षामध्ये जोपर्यंत वशिल्याने आणि पैसा पाहून पदे आणि उमेदवारी देणे बंद होत नाही तोपर्यंत कॉंग्रेसला यश मिळणार नाही, असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे नेते जनमानसात मिसळत नाहीत. त्यामुळेही कॉंग्रेसला फटका बसतो, असेही राणे या वेळी म्हणाले.