मुंबई: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश आणि त्यानंतर दिल्ली, पश्चिमबंगाल, बिहार आदी राज्यांचा अपवाद वगळता चौखूर उधळलेला भाजपचा वारू थांबण्याचे सध्यातरी चिन्ह नाहीत. राज्यात झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुक निकालावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून आतापर्यंत भाजपला सर्वाधिक २२, काँग्रेसला २१, राष्ट्रवादी १९ आणि शिवसेनेला १५ नगरपालिकांची सत्ता मिळाली आहे. याशिवाय २६ ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. काही जागांचे निकाल येणे अद्याप बाकी आहे.

दरम्यान, राज्यातील 51 नगरपालिकांवर मतदारांनी भाजपच्या नगराध्यक्षांना पसंती दिली आहे. भाजपखालोखाल जनतेने शिवसेनेला पसंती दिली असून, शिवसेनेचे २5 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर,  काँग्रेसचे 24, राष्ट्रवादीचे 18  तर अन्य पक्षांचे  29 अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. आतापर्यंत नगरपालिकांमधील 2, 501जागांवरील निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 482, काँग्रेसने 408, शिवसेनेने 402 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 12 तर बहुजन समाज पक्षाने 4 जागांवर विजय मिळवला आहे. अन्य पक्षांना 583 जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, मागिल काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले होते. त्यात कोपर्डीतील सामुहीक बलात्कार प्रकरणानंतर सुरू झालेले मराठा समाजाचे मोर्चे. त्या मोर्चांशी स्पर्धा करत संविधान बचाव अशी हाक देत रस्त्यावर उतरलेले दलित बांधव या सर्वांमुळे राज्याच्या राजकारणाचे संदर्भ बदललल्याची चिन्हे होती. हे सर्व प्रकरण कमी होते न होते, तोपर्यंत केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वसामान्य जनतेची फरफट झाली. त्यामुळे या दोन्ही घटनांचा फटका भाजपला या निवडणुकीत बसेल असा अंदाज राजकीय पंडीतांचा होता. पण, हे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने पुन्हा एकदा आपले स्थान भक्कम केले आहे. तसेच, राज्यात आपणच क्रमांक एक असल्याचे दाखवून दिले आहे. (हेसुद्धा वाचा, नाशिक नगरपंचात निवडणुक: राष्ट्रवादीचे घड्याळ बंद; शिवसेनेचा बाण वर्मी लागला)

प्रत्यक्ष मतमोजनीला सुरूवात झाली तेव्हा, राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे चित्र होते. तर, शिवसेना दुसऱ्या-तिसऱ्या आणि भाजप थेट चौथ्या स्थानावर असल्याचे दिसत होते. मतमोजनीदरम्यान हाती येत असलेले आकडे आणि घसरत चाललेला आलेख पाहून भाजपच्याही गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र, दुपार नंतर भाजपचा भाव अचानक वधारला. भाजपने जोरदार मुसांडी मारत सर्व पक्षांना मागे टाकले. आणि क्रमांक एकचे स्थान पटकावले. त्यामुळे मराठा मोर्चा, नोटबंदी यांसारख्या मुद्द्यांचा या निवडणुकीवर फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसते.