आज सकाळी च्या सुमारास गिरणी कामगारांसाठी २,४१७ सदनिकांची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे एमएमआरडीएच्या पनवेल तालुक्यातील मौजे कोनमधील घरांसाठी ही सोडत निघेल. सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिममधील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. सोडतीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून म्हाडा प्रशासन सज्ज झालं आहे.

एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका या प्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी सहा लाख रुपये आकारुन गिरणी कामगारांना वितरित करण्यात येणार आहेत. सोडत प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांची माहिती म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या सोडतीमध्ये म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १,४८,७११ गिरणी कामगार तसेच वारस यांच्या यादीमधून २०१२च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, २०१२च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिम वेळी अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमधील अर्जदार, तसेच म्हाडाच्या मे २०१६च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना यावेळी काढण्यात येणा-या सोडतीतून वगळण्यात येणार आहे.

या वगळण्यात येणा-या अर्जदारांव्यतिरिक्त उर्वरित अर्जदारांचा या सोडत प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वान मिल कुर्ला आणि शिवडी या मिलच्या अर्जदारांचा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.