मुंबई – मिल कामगारांसाठी आजचा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आपलं स्वत:चं हक्काचं घर मुंबई घेण्याची इच्छा असणा-या ज्या क्षणाची वाट होती तो क्षण आता आला आहे. आज म्हाडाच्या मुंबईतील २,४१७ घरांची सोडत निघणार आहे. आज वांद्रे येथील रंगशारदा सभागॄहात या घरांची सोडत आता सुरू झाली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे एमएमआरडीएच्या पनवेल तालुक्यातील मौजे कोनमधील घरांसाठी ही सोडत निघेल. या लॉटरी सोडतीचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही बघू शकता. (आज MMRDA च्या २,४१७ सदनिकांची सोडत)

मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना म्हाडातर्फ़े अनेकांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचं घर स्वस्तात दिलं जात आहे. यामध्ये म्हाडाने मिल कामगारांना देखील सामावून घेतलं आहे. मुंबईचा एक भाग असलेल्या या मिल कामगारांना आज हक्काची घरं मिळणार आहे. आज या सोडतमध्ये कोणत्या मिल कामगाराचं नशिब उजळणार आहे, हे  पाहण खरंच कौतुकाचं आहे.  lottery.mhada.gov.in या लॉटरी सोडतीचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही या लिंकवर बघू शकाल.

या सोडतीमध्ये म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १,४८,७११ गिरणी कामगार तसेच वारस यांच्या यादीमधून २०१२च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, २०१२च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिम वेळी अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमधील अर्जदार, तसेच म्हाडाच्या मे २०१६च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना यावेळी काढण्यात येणा-या सोडतीतून वगळण्यात येणार आहे.