डोंबिवली: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण-शिळ रोडवरील टाटा पॉवरजवळ एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

17 वर्षीय पीडित मुलगी सोनारपाडा येथील रहिवासी आहे. 12 जूनला सायंकाळी 6च्या सुमारास ती क्लासमधून कल्याण शिळ रोडवरून घराकडे परतत होती. अचानक धीरेंद्र मेहता याने तिचे तोंड दाबत जबरदस्तीने रिक्षात बसवले. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. रिक्षा टाटा नाका येथे थांबली असता तिथे उपस्थित असलेल्या भावाने हा प्रकार पाहिला आणि बहिणीच्या सुटकेसाठी धाव घेतली.

त्यावेळी रिक्षाचालक मनवसिंग राजेंद्र सिंग याला तरुणीच्या भावाने रोखून धरले. या मुलीने रविवारी सायंकाळी मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी धीरेंद्र मेहता व रिक्षा चालक मनवसिंग राजेंद्रसिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.  कोर्टानं दोघांची गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.