मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. तक्रार करत झाल्या घटनेबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सुरक्षारक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचंही बेर्डे यांनी सांगितलं.

प्रिया बेर्डे या रविवारी रात्री मीरा रोडच्या एका सिनेमागृहात सिनेमा बघायला गेल्या होत्या. त्यावेळी दारुच्या नशेतील एक इसम त्यांच्या शेजारी येऊन बसला व त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागला. या प्रकारानंतर व्यवस्थापनाने तातडीने हस्तक्षेप केला आणि त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

या सर्व प्रकरणी माध्यमांना दिेलेल्या माहितीत बेर्डे म्हणाल्या, ‘मुलीसोबत चित्रपट पाहण्यासाठी मी गे होते. त्यावेळी सुरुवातीपासूनच तो माणूस माझ्याकडे पाहत होता. मी त्याच्याकडे फार काही लक्ष दिलं नाही. त्यानंतर तो मनुष्य उठून गेला. मुख्य म्हणजे तो इतरांनाही त्रास देत होता. काही वेळानंतर तो बाहेर गेला आणि पुन्हा माझ्या बाजूची एक सीट सोडून बसला. थोड्या वेळाने तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवल्यानंतर मी त्याला मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, मी त्याचा पाठलाग केला आणि सुरक्षारक्षकांना त्याबद्दलची माहिती दिली.

या प्रकरणी बोरिवलीतील ४३ वर्षीय सुनील जानी नामक व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कलम ३४५ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.