मुंबई – मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील रस्त्यांची आणि फुटपाथची दुरावस्था पाहून हतबलता व्यक्त करुन एक दिवस झाला असतानाच एका सहा वर्षांच्या मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू झाला आहे.

गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली असुन महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी गेल्याकाही दिवासापासून हा खड्डा खोदण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शौचालयाच्या नाल्याच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले होते. ठेकेदाराने या खड्याभोवती सर्व बाजूंनी सुरक्षा पत्रे लावले नव्हते. याच खड्ड्यात पडून सहा वर्षांच्या मोहम्मद अलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या चिमुरड्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. (हे पण पाहा: आई-वडिलांना मुंबईतील रस्त्यांवर चालवण्याची भीती वाटते – मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता)

बुधवारीच मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता यांनी रस्त्यांच्या आणि फुटपाथच्या दुरावस्थेबाबत हतबलता व्यक्त केली होती. अजोय मेहता यांनी म्हटले होते की, फुटपाथच्या बिकट अवस्थेमुळं माझ्या वृद्ध आईवडिलांना बाहेर फिरायला न्यायला भीती वाटते. माझ्या वॉर्ड ऑफिसरला मी सांगतो की एकदा तुमच्या आई वडिलांना फुटपाथवरुन चालायला घेऊन जा आणि मग मला सांगा फुटपाथची काय अवस्था आहे?.