मुंबई: रविवारच्या दिवशी विश्रांती घेऊन सुट्टी साजरी केलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून राजधानी मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरांतही संततधार सुरूच आहे. त्यामुळे संततधार पावसाचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असून मध्य रेल्वे तब्बल 20-25 मिनिटे उशिरानं धावत आहे. दादर, वरळी, विलेपार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने विशेष जोर धरला आहे.

गेली तीन दिवस पावसाचा जोर वाढताच आहे. मात्र, रविवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकर सुखावले होते. मात्र, सोमवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे कामावर जाणारा चाकरमानी, विद्यार्थी, फेरीवाले तसेच, कामानिमीत्त मूंबईत येणारे मुंबईबाहेरचे नागरीक यांची चांगली गोची झाली आहे. (हेही वाचा, आठवड्याचा पहिला वार ‘पाऊस वार’ : 24 तासात मुसळधार कोसळणार)

दरम्यान, मुंबईतून काही ठिकाणी पावसाने किरकोळ पडझड झाल्याचे वृत्त येत आहे. गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीत टेकडीवरील काही झाडे उन्मळली आहेत तर, टेकडीवरील माती काही झाले संरक्षक भिंतीवर पडली आहेत. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार सोमवारसह मंगळवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.