मुंबई- मित्राने मारलेली मिठी मुंबईतल्या डॉक्टराला चांगलीच महागात पडली आहे. मित्राच्या प्रेमाच्या मिठीने डॉक्टरच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. डॉ. मधुकर गायकवाड असं या डॉक्टरांचं नाव आहे. ते मुंबईच्या फोर्ट भागातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत.

धुळ्यात डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ १८ मार्च रोजी आझाद मैदानात डॉ. मधुकर गायकवाड आणि त्यांचे मित्र डॉ. अमित बडवे सहभागी झाले होते. आंदोलनानंतर दोघांनी एकमेकांना भेटायचे ठरवले. डॉ. मधुकर गायकवाड आणि डॉ. अमित बडवे यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली. यावेळी डॉ. बडवे यांनी उत्साहाच्या भरात मारलेल्या मिठीमुळे डॉ. गायकवाड यांच्या तीन बरगड्या मोडल्या.

 

आता १५ दिवसांची विश्रांती…

सुदैवाने डॉ. गायकवाड यांना झालेली दुखापत फार गंभीर नाही. त्यांना १५  दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बरगड्यांमधील फ्रॅक्चर नैसर्गिकरित्या भरुन येईल, असेही सांगण्यात आले आहे.

अशी होती डॉक्टरांची यारी

या दोन्ही डॉक्टर मित्रांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. डॉ. बडवे यांना बॉडीबिल्डिंगची अतिशय आवड असल्याचं सगळ्यांना माहित होतं. 1990 मध्ये एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर डॉ. गायकवाड यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात नोकरी मिळाली. तर डॉक्टर बडवे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रॅक्टिसला सुरुवात केली. कॉलेज संपल्यानंतर त्या दोघांची भेट झाली नव्हती.

मी माझ्या केबीनमध्ये होतो, तेव्हा अमित आला. त्याला पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला. तो माझ्या दिशेने धावत आला आणि मिठी मारली. पण काय होतंय हे कळायच्या आतच माझ्या बरगड्या मोडल्या.

– डॉ. मधुकर गायकवाड