मुंबई – आज तुम्ही मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत आहात तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, मुंबईतील मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या ठराविक रेल्वे स्थानकांवरच थांबतील.

मध्य रेल्वे मार्गावरील विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट, हार्बरवर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन फास्टवर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान विक्रोळी ते दिवा मार्गावरील डाऊन फास्ट वाहतूक डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे डाऊन स्लो लोकल कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा या स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या दरम्यान कुर्ला ते वाशी रेल्वे वाहतूक बंद असणार आहे. हार्बरवरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. (चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद)

यासोबतच पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे. त्यामुळे सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक आहे.