मुंबई: एकीकडे मुंबई पोलिसांवर हल्ल्यांच्या अनेक घटना समोर येत असतानाच मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मंगळवारी रात्री एका भरधाव ट्रकने बाईकवर असलेल्या दोन पोलिसांना उडवले. या अपघातात दोन्ही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हे दोन्ही पोलीस गस्तीवर असताना ही दुर्घटना घडली आहे. गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या बाईकला भरधाव वेगाने येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही पोलीस रस्त्यावर दूरवर फेकले गेले.

वाकोला फ्लायओव्हरजवळची ही घटना आहे. यानंतर गंभीर दुखापत झालेल्या या पोलीस कर्मचा-यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. तसेच वाहन चालकालाही अटक करण्यात आली.