नवी मुंबई: वाशीतील महाराष्ट्र राज्य बोर्ड मुंबई विभागीय कार्यलायाची इमारत ही धोकादायक इमारत असल्याचा खुलासा स्ट्रक्चरल ऑडिटमधून करण्यात आला आहे. ही इमारत २० वर्ष जुनी असून या इमारतीच्या पिलरचा तडे गेल्याचे या ऑडिटमधून सांगण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असून परीक्षांच्या निकालावर याचा परिणाम होईल का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र इमारतीच्या कामकाजाची डागडूजी सुरू झाली तरी त्याचा निकालावर काही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहेत.

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वॄत्तानुसार, वाशीतील या इमारतीत लाखोंच्या संख्येने प्रश्न आणि उत्तर पत्रिका स्टोर केल्या जातात. मुंबई विभागीय कार्यालयाने महाराष्ट्र राज्य बोर्ड पुणे येथे याबाबत माहिती कळवली असून इमारतीच्या टागडूजीचे लवकरात लवकर काम सुरू करण्याची सूचना केली आहे. आता यावर महाराष्ट्र राज्य बोर्ड काय पावले उचलतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

पेपर तपासणारे मॉडरेटर्स हे या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पेपर तपासण्यासाठी बसतात. हे शिक्षक त्यांचा जीव मुठीत घेऊन बसतात. त्यामुळे बोर्डाने लवकरात लवकर वेगळी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आणि इमारतीच्या डागडूचीचं कामही लवकरात लवकर केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी बोर्ड सदस्य उदय राणे यांनी हिंदुस्थान टाईम्ससोबत बोलताना दिली आहे.

यावर विभागीय कार्यालयाचे सेक्रेटरी सिद्धेश्वर चांदेकर म्हणाले की, ‘इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही केलं आहे. त्यानुसार इमारतीच्या डागडूजीचं कामही प्रोसेसमध्ये आहे. आधी कामाची निविदा काढून ते राज्य मंडळाला पाठवून, त्यांची परवानगी घेऊन काम सुरू केलं जाईल. यामुळे निकालात अजिबात विलंब होणार नाहीये. सध्या जसं काम सुरू आहे तसच सुरू राहणार आहे. इमारत इतकीही वाईट नाही की, ती लगेच पडेल. निविदा काढल्यावर राज्य मंडळाची परवानगी मिळताच काम सुरू होईल’.

ते पुढे म्हणाले, ‘सध्या या इमारतीतील काम थांबवता येणार नाही. इतक्या मोठ्या संख्येने पेपर ठेवण्यासाठी दुसरी जागाही नाहीये. इतकेच नाहीतर निकालानंतरही इथे पेपरचे गठ्ठे मोठ्या प्रमाणात असतात. उत्तर पत्रिकांची फोटोकॉपी इथे ठेवल्या जातात. कारण विद्यार्थ्यांना अनेकदा त्या बघायच्या असतात. आरटीआय अंतर्गत त्या त्यांना दाखवण्यासाठी इथे ठेवल्या जातात’, असेही ते म्हणाले.

(Image Credit: Hundustan Times)