(Image Credit: ABP Majha)

लातूर: राज्यभरात आपल्या विविध मागण्यांसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिमांनीही मूक मोर्चाचे आयोजन सुरू केले आहे. लातूर शहरात आरक्षणाच्या मागणीसाठी लातूरमध्ये मुस्लीम समाजाने विराट मूक मोर्चा काढला. पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं नियोजन देऊन हा मोर्चा विसर्जित करण्यात आला. शहरातील इदगाह मैदानातून हा मोर्चा काढण्यात आला.

मराठा समाजाने आरक्षण, कोपर्डी बलात्कार आरोपींना फाशी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये बदल अशा मागण्या केल्या होत्या. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुस्लीम समाजाकडून राज्यभर मूक मोर्चांचा आयोजन केलं जात आहे. याआधी दलित समाजानेही अ‍ॅस्ट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या समर्थनात मूक मोर्चे काढले होते.

मुस्लीम समाजाला शिक्षणात, नोकरीत आरक्षण द्यावं, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये. तसेच मुस्लीम समाजावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या हल्ल्यांपासून सरंक्षण द्यावं, अघोषित गोसंरक्षकांवर बंदी आणावी, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवावं, अशा मुस्लीम समाजाच्या मागण्या आहेत.