जम्मूतील नगरोटामध्ये दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना शेवटचा निरोप दिला जाणार आहे. पंढरपूरच्या शहीद मेजर कुणाल गोसावी यांचं पार्थीव पुण्याहून त्यांच्या मूळगावी वाखरी येथे नेलं जात आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील जानापुरीचे शहीद लान्सनायक संभाजी कदम यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. (पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे 2 दोन सुपूत्र शहिद)  

नगरोटामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्य़ाला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं आणि ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. मात्र ९ भारतीय जवानांना वीरमरण आलं, ज्यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्र होते. शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली की, जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे पण मला माझ्या मुलाचा अभिमान देखील आहे. ३२  वर्षांचे कुणाल गोसावी नऊ वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी आणि दोन भाऊ आहेत.

कुणाल गोसावी यांची प्राथमिक शिक्षण पंढरपूरला झाले. प्राथिमक आणि माध्यमिक शिक्षण कवठेकर प्रशालेत झालं. त्यानंतर पुढे त्यांनी एम कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आणि ते लष्करात दाखल झाले. २००७ साली कुणाल गोसावी कॅप्टन पदावर रूजू झाले. महत्वाची बाब म्हणजे २६ नोव्हेंबरला आपली सुट्टी संपवून कुणाल गोसावी रूजू झाले होते. आणि अवघ्या तीनचं दिवसात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे पत्नी उमा आणि ४ वर्षाची मुलगी उमंग आहे.