मुंबई: भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला सुनावले असले तरी, पाकिस्तानची वृत्ती सुधारण्याचे चिन्ह नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू येथील नागरोटा येथे लष्करी तळावर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा हल्ला केला. या महाराष्ट्राचे 2 सुपुत्र शहीद झाले. मेजर संभाजी कदम आणि कर्नल कुणाल गोसावी अशी या सुपूत्रांची नावे आहेत. मेजर संभाजी हे नांदेडचे तर, कर्नल कुणाल हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. दोघांच्याही मृत्यूनंतर नांदेड आणि पंढरपूरवर शोककळा पसरली आहे.

मुळचे पंढरपूरचे असलेले कर्नल कुनाल गोसावी हे 28 वर्षांचे असून, ते चार वर्षांपूर्वी  चार वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी आणि दोन भाऊ आहेत. पहाटे साडेपाच वाजता दहशतवाद्यांशी लढताना गोसावी यांना वीरमरण आलं. तर, मु. जानापुरी, ता. नांदेडचे रहिवासी असलेले मेजर संभाजी कदम हे 5 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान होते. वय वर्षे 35 असलेल्या मेजर कदम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि 3 वर्षांची मुलगी आहे. शिपाई रघविंदरही या हल्ल्यात शहीद झाले आहेत. मेजर संभाजी हे शहिद झाल्याची माहिती जानापुरीचे सरपंच बळी पाटील यांना लष्करी मुख्यालयाने कळवली. त्याच्यामार्फतच ही बातमी कदम यांच्या कुटूंबियांपर्यंत पोहोचविण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी लष्करी मुख्यालयाच्या संपर्कात आहेत. शहीद कदम यांचे पार्थिव नांदेडकडे आणण्यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. (हेही वाचा, कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे पोलीस चकमकीत ठार)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान सिमेवर दोन्ही देशांकडून चकमक सुरू आहे. उरी येथील दहशतवादी हल्ला केल्यावर भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भांबावून गेलेल्या पाकिस्तानने भारताविरूद्ध कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये पाकिस्तानने शेकडो वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, पाकिस्तान अशा चकमकींना सैनिकांना पूढे न करता दहशतवाद्यांना पूढे करत आहे. भारतीय सैन्याला चकमकीत गुंतवून ठेवत दहशतवाद्यांना सीमाभागात घुसण्यासाठी पाकिस्तान जंग जंग पछाडत आहे.