नाशिक: दुस-या जातीतील मुलाशी लग्न केल्याच्या कारणावरून गर्भवती मुलीची हत्या करणाऱ्या नराधम बापाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये एकनाथ कुंभारकर यानं रिक्षात बसलेल्या गर्भवती मुलीचा दोरीनं गळा आवळून खून केला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीनंतर काल (सोमवार) आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

दुर्मिळातील दुर्मीळ घटना असे निरीक्षण नोंदवत या कृत्याला देहदंडाची शिक्षाच होऊ शकते, असे कोर्टाने स्पष्ट केले. एकनाथ किसन कुंभारकर (रा. मोरे मळा, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ‘ऑनर किलिंग’चा हा धक्कादायक प्रकार 28 जून 2013 रोजी गंगापूर रोडवरील सावरकर हॉस्पिटलजवळ घडला होता. (हे पण वाचा: धक्कादायक! आईने TV पाहण्यास मनाई केली म्हणून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या)

आई आजारी असल्याचे खोटं सांगून एकनाथ कुंभारकरनं मुलगी निशाला रिक्षात घेऊन गंगापूर रोडवर नेलं. एका हॉस्पिटलजवळ रिक्षा थांबवून रिक्षा चालकास मुलीच्या आईला बोलवण्यास पाठवले. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने निशाचा दोरीनं गळा आवळत निर्घृण खून केला होता.

रिक्षा चालक प्रमोद आहिरे यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्याने मुलीस सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा आणि पोटातील गर्भाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी एकनाथच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिक्षा चालक प्रमोद अहिरेची एकमेव साक्ष महत्वाची ठरल्याने नराधम बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.