रत्नागिरी: कोकणामध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसला धक्का बसला आहे. निलेश राणे यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. निलेश राणे हे माजी खासदार असून, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पूत्र आहेत. दरम्यान, दस्तूरखुद्द नारायण राणेच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वाटेवर असल्याची जोदराद चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या राजीनाम्यामुळे ही चर्चा गंभीर स्वरूपाची बनली आहे.

गेली दीड वर्षे रत्नागिरीत कॉंग्रेसने जिल्हाध्यक्षच नेमला नाही. जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हापरिषद, पंचायत समितीत्या निवडणुकाही जिल्हाध्यक्षाशिवायच पार पडल्या. या निवडणुकीत उमेदवार निवडीवेळी पाच तालुक्यात स्वत: नारायण राणे यांनी तर उर्वरीत चार तालूक्यांमध्ये क़ॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. जिल्हाध्यक्ष निवडीवरूनच निलेश राणे यांनी तीव्र शब्दांत टीका करत राजीनामा दिला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे मंगळवारी (21 मार्च) दिला. राजीनामा पत्रातही त्यांनी जिल्हाध्यक्ष निवडीबाबत झालेल्या दिरंगाईबाबत तीव्र शब्दात आपली मते व्यक्त करत पक्षनेतृत्वावर शरसंधान साधले आहे. जिल्हाध्यक्षच नेमू शकत नसलेल्या पक्षाला आम्ही मतदान का करायचे, असा प्रश्न प्रचारादरम्यान आपल्याला विचारला जात होता आणि त्यामुळेच काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा,कोकणात कॉंग्रेसला धक्का; वाचा निलेश राणे यांचे राजीनामा पत्र )

दरम्यान, आपण प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला तरी आपण काँग्रेस पक्षातच काम करत राहणार असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या राजीनाम्यावर कॉंग्रेसच्या गोटातून काय भूमिका घेतली जाते याबाबत उत्सुकता आहे.