मुंबई: नोटाबंदीनंतर देशातील नागरिकांना बॅंकेच्या बाहेर आणि एटीएम बाहेर रांगा लावाव्या लागत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच नोटाबंदीनंतर नोकरदारांचा पहिलाच पगार आज सर्वांच्या खात्यात जमा होणार आहे. अशातच एटीएम आणि बॅंकांबाहेरील कमी झालेल्या रांगा पुन्हा एकदा वाढणार आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी आपल्या कर्मचा-यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांची रांगा लावण्याच्या कटकटीतून सुटका केली आहे. मुंबई पोलिस आणि अॅक्सिस बँकेच्या वतीनं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहे. आजपासून पुढचे आठ दिवस दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत अॅक्सिस बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन पोलिसांना चेकद्वारे आपला पगार काढता येणार आहे. त्याशिवाय मुंबई पोलीस मुख्यालय, नायगाव मुख्यालय आणि इतर ५ विभागांजवळ मायक्रो एटीएमची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांच्या ९३ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यासोबतच, क्राईम ब्रँच, आणि इतर कर्मचारी मिळून ४५ हजार पोलिसांना याचा फायदा मिळणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मिळालेला हा दिलासा नक्कीच सुखद असेल.

तर एटीएम बाहेरील रांगा आता जरी कमी झाल्या असल्यातरी अनेकांचे पगार होणार असल्याचे त्या रांगा पुन्हा वाढणार आहेत. अशातच सुट्या पैशांचीही अडचण निर्माण होणार आहे. कारण अजूनही एटीएममधून २००० ची नोट येत आहे.