File Photo

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. एक्सप्रेस वेवरील अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा या परिसरात 500 मीटर रस्त्यावर टँकरमधील ऑइल सांडले आहे. त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत.

शनिवार-रविवारी विकेण्ड सेलिब्रेट करण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना याचा मोठा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर तेल सांडल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्यादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या रस्त्यावरील ऑइल हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

शनिवार सुटीचा दिवस असल्याने या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांची गर्दी असते. त्यात उन्हाचा वाढलेला तडाखा आणि आता रस्त्यावर ऑईल सांडल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पूर्वपदावर यायला आणखी काही तास लागणार असल्याची माहिती मिळत आहे.