पंढरपूर – जम्मू काश्मीरमधील नागरोटा येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मेजर कुणाल गोसावी शहीद झाले. मेजर कुणाल गोस्वामी हे पंढरपूरजवळील वाखरी येथील निवासी होते. वाखरी येथे गुरुवारी हजारोंच्या उपस्थितीत शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोस्वामी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुणाल गोसावी अमर रहेच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली होती. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा गगनभेदी घोषणा ऐकायला मिळत होत्या. मेजर कुणाल यांच्या पार्थिवाला त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीनंच मुखाग्नी दिला.

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शहीद मेजर कुणाल यांचा मृतदेह पंढरपूरमध्ये आणण्यात आला. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा गोसावी यांच्या घरापासून निघाली. यावेळी त्यांच्या गावातील रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक उपस्थित होते. (हे पण पाहा: महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना आज अखेरचा निरोप)

मेजर कुणारगीर गोसावी यांच्या हौतात्म्यामुळे संपूर्ण सोलापूरसह पंढरपूरवर शोककळा पसरली आहे. लष्करी पद्धतीने मानवंदना देण्यात आली. सैन्याच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मेजर कुणाल यांना मानवंदना दिली. मेजर कुणाल यांना निरोप देण्यासाठी वाखरीत हजारोंची गर्दी लोटली होती.