पुणे:  वाहनचालकांनी वाहतुकिच्या नियमांचे पालन करावे यासाठी पुण्याच्या रस्त्यावर शनिवारी चक्क यमदेवच अवतरे. या यमदेवांना पाहण्यासाठी रस्त्यावरील पुनेकरांनी एकच गर्दी केली. पण, या यमदेवांनी वाहतुकिचे नियम तोडणाऱ्यांची गचांडी धरायला जेव्हा सुरूवात केली तेव्हा अनेकांनी तेथून पळ काढला.

यमराजांना पाहून अनेकांनी त्यांना गराडाच घातला. काही पुणेकरांनी त्याच्यासोबत सेल्फी काढला. तर, काही पुणेकरांनी यमराजाचा हात आपल्यावर पडू नये म्हणून दूरूनच काढता पाय घेतला. पुणेकरांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनीच ही शक्कल लढवली. पुणेकरांनी किमान वाहतुकीचे नियम पाळावेत, त्यासाठी सिग्नल न तोडणे, वेगावर नियंत्रण राखणं, हेल्मेट घालणं असे नियम पाळल्यास अपघात टळतील याची जाणीव करून देण्यासाठी पुणे पोलिसांच्या कृपेने यमराज रस्त्यावर अवतरले. (हेही वाचा, मृत्यूपूर्वी यमराज प्रत्येकाला देतात ४ संदेश)

अखेर यमराजांना पाहून तर, लोक वाहतुकिचे नियम पाळतील अशी पुणे पोलिसांची भाबडी आशा. पण, झाले भलतेच. पुणेकरांना हा यम भारीच आवडला. त्याला घाबरून पळण्याऐवजी पुणेकरांनी थेट त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासच सुरूवात केली. पण, यातूनही यमराज संदेश देतायत की, वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा तुम्हाला लवकरच खऱ्याखुऱ्या यमाची भेट घ्यावी लागेल.