नोटबंदीनंतर वारंवार टोलमाफी मिळाल्यानंतर उद्या म्हणजे शुक्रवार २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पुन्हा देशभरात टोल नाके सुरु होणार आहेत. सुट्ट्या पैशांचा प्रश्न सोडवण्यासाठी टोलची कुपन देण्याचा विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे सुरु आहे. ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतची ही कुपन्स असतील. त्यामुळे टोलचे पैसे देतानाही ही कुपन्स वापरता येतील, तसंच उरलेले सुट्टे पैसे म्हणूनही टोलधारक ही कुपन्स ग्राहकांना परत करतील.

८ नोव्हेंबरनंतरच्या नोटबंदीनंतर १४,१८,२४ नोव्हेंबर आणि २ डिसेंबरपर्यंत वेळोवेळी टोलमाफी देण्यात आली.दरम्यान, पेट्रोल पंपांवर ५०० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय कधीही रद्द होऊ शकतो. याबाबतची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्रालयाने आता देशभरातील टोलनाक्यांवर पैशांऐवजी कुपन्स वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात टोल भरताना पाच ते शंभर रूपये मुल्याची कुपन्स वापरली जावी, असे म्हटले आहे.

याशिवाय, टोल भरल्यानंतर संबंधित वाहनधारकाला उर्वरित सुट्टे पैसेदेखील कुपन्सच्या स्वरूपातच परत दिले जातील. नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने येत्या २ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवरील टोल माफ केला आहे. मात्र, यामध्ये आणखी मुदतवाढ करण्याचा सरकारचा इरादा नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता २ डिसेंबरनंतरही टोलनाक्यांवर सुट्ट्या पैशांची चणचण जाणवण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे वाहतूक व रस्ते मंत्रालयाने मुख्य टोलनाक्यांवर ५, १० ,५० आणि १०० रूपयांची कुपन्स आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. देशातील साधारण ४०० टोलनाक्यांवर ही कुपन्स विकत मिळू शकतात. त्यानंतर वाहनधारकांना प्रत्येक टोलनाक्यावर या कुपन्सचा उपयोग करता येऊ शकेल. मात्र, दुसरीकडे २ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर १५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर जुन्या ५०० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचेही वाहतूक मंत्रालयाने जाहीर केले आहे. मात्र, त्यानंतरही टोलनाक्यांवर कुपन्सच्या खरेदीसाठी जुन्या ५०० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येऊ शकते.