मुंबई: राज्यातील सत्तेत सहभागी असून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद काही कुणापासून लपलेले नाहीयेत. श्रेयाचा वाद असो वा अधिकारांचा यामुळे शिवसेना नेहमीच भाजपला टिकेची मानकरी ठरवते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मध्यावधीची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही ही चर्चा रंगली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे नुकतेच तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले होते. तेव्हाही हा मुद्दा होताच. शिवसेना भाजपसोबतच्या संसार सुखी नाही हे वेळोवेळी बघायला मिळाले आहे. अशात अमित शहा यांनी जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर आम्हीच जिंकू, असं थेट आव्हानच अमित शहा यांनी दिल्याने शिवसेना आणखीनच गोंधळल्याचे दिसते आहे.

मुंबई दौ-यावर असताना अमित शहा यांनी शिवसेना ही काय आमची मजबूरी नाही. आणि राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर आम्हीच जिंकू असा सूर लावला. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला काश्मीरच्या मुद्द्यावरून घेरले आहे. तर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ‘महाराष्ट्रातील मध्यावधीचे काय व्हायचे ते होईल, अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे मध्यावधीनंतर त्यांचेच सरकार येईल. त्यांना हवा तो राष्ट्रपती होईल. प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण कश्मीरची लढाई जिंकणार काय? जवानांचे प्राण वाचतील काय? कश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय? याचे उत्तर देशाला हवे आहे!, असा सवाल सेनेने ‘सामना’ अग्रलेखातून भाजपला विचारण्यात आला आहे. (हे पण वाचा: निवडणुका झाल्या तर भाजपाचाच विजय होईल- अमित शहा)

अमित शहा हे मुंबई दौ-यावर असताना त्यांना शिवसेना-भाजप यांच्यातील वादांवरही अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी सरळ उत्तर दिले की, जर वाद असते तर ते सत्तेत नसते. शिवाय शिवसेना ही आमची मजबूरी नाही. म्हणजे एकप्रकारे शिवसेनेचं अमित शहा यांनी महत्वच कमी करून टाकलं, असंही बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना आणखीनच खवळल्याचे चित्र आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

* राजकारणातील लढाया म्हणजे निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात. त्यामुळे उद्या महाराष्ट्रात मध्यावधी झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. अर्थात मध्यावधीचे काय होणार यापेक्षा आम्हाला चिंता आहे ती कश्मीरचे काय होणार? हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार? आमच्या भूमीवरील हे दोन्ही स्वर्ग आज हिंसा व दहशतवादाने खाक होताना दिसत आहेत.

* अनंतनाग जिल्ह्यात पोलीस पार्टीवर हल्ला करून सात पोलिसांना ठार करण्याचे भेकड कृत्य अतिरेक्यांनी केले आहे. पोलीस व जवान यांच्या हौतात्म्यांचे आकडे मोजायचे तरी किती, हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार, हा प्रश्न काहींना महत्त्वाचा वाटत आहे. महाराष्ट्रातील सरकारचा टेकू काढून घेतला तर पाठिंब्यासाठी पाच-पंधरा डोकी विकत घेऊन सरकार टिकविण्याची धडपड समजण्यासारखी आहे. फडणवीस यांचे सरकार पाच वर्षांसाठी टिकेलच टिकेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली आहे, पण देशाच्या नकाशावर कश्मीर टिकेल काय? व त्या भूमीवरील जवानांचे हौतात्म्य वाया तर जाणार नाही ना अशी चिंता राष्ट्रभक्तांना पडली आहे. (हे पण वाचा: मध्यावधी निवडणुकांसंदर्भात अमित शहांनी केलं मोठ वक्तव्य)

* कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या उघड उघड जवानांवर हल्ले करणाऱया तरुणांचे समर्थन करीत आहेत व कश्मीरातील परिस्थितीस जवानांना जबाबदार धरीत असतील तर तो आमच्या सैन्याचा अपमान आहे. महाराष्ट्रात शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरकस भूमिका घेते. राष्ट्रीय प्रश्नांवर स्वतंत्र व देशाच्या स्वाभिमानाचे मत मांडते म्हणून शिवसेनेस धडा शिकविण्याचे डावपेच आखले जातात, पण कश्मीरात ‘अराष्ट्रीय’ भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी भाजप समर्थपणे उभी आहे. मेहबुबांच्या बेलगाम अराष्ट्रीय वक्तव्यांवर ‘ब्र’ काढण्याची हिंमत परिवारातील लोक दाखवत नाहीत.

* आश्वासनांच्या टोप्या लावून व या बोटावरील थुंकी त्या बोटावर करून ते टिकवले जाईलही, पण कश्मीर कसे टिकविणार आहात? आताच कश्मीर खोऱ्यात १४४ कलम लागू केले आहे. लष्करी तळांवर, सुरक्षा दलाच्या ताफ्यांवर हल्ले होत आहेत. अतिरेक्यांचे एन्काऊंटर होताच कश्मीरात उठाव होत आहेत. लश्कर-ए-तोयबा, अल कायदा, इसिस व आयएसआय यांनी कश्मीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवले असेल तर महाराष्ट्रातील सत्तेची चिंता सोडून या मंडळींनी आपल्या माना कश्मीरकडे वळवायला हव्यात. कश्मीर व दार्जिलिंग येथे हिंसाचार भडकला आहे.

* कश्मीरात अतिरेक्यांचा उच्छाद आहे तर दार्जिलिंग येथे स्वतंत्र ‘गोरखालॅण्ड’साठी हिंसक आंदोलन सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दार्जिलिंग येथे पोलिसांबरोबर निरपराध्यांचे बळी गेले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवूनही ते ऐकायला तयार नाहीत. आंदोलकांकडे सर्व प्रकारची हत्यारे आहेत. ईशान्येकडील उग्रवाद्यांकडून दार्जिलिंगमधील आंदोलकांना पाठबळ मिळत आहे व हा प्रकार गंभीर आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण दार्जिलिंगच्या पेटलेल्या होळीवर कोणी राजकीय पोळी भाजू नये इतकीच आमची अपेक्षा आहे.