ठाणे – ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असताना एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ठाण्यातील उपवन तलावाजवळ असणा-या सत्यम लॉजमधील तळघरात अनैतिक धंदे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर, या ठिकाणी तब्बल २९० अनधिकृत खोल्या आढळून आल्या आहेत.

बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई ठाणे महापालिकेने बुधवारपासून सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान सत्यम लॉजमधील तळघरात अनैतिक धंदे सुरू असल्याचे उघडकीस आले. सत्यम नावाच्या लॉजमध्ये ३ मजल्याचं बांधकाम करण्यात आलं होतं, ज्यामध्ये तब्बल २९० खोल्या बनविण्यात आल्या होत्या. या सर्व खोल्या १० बाय २० आकाराच्या होत्या ज्यामध्ये एक बेड आणि पंखा अशा प्रकारचं साहित्य होतं. या सर्व २९० अनधिकृत खोल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत.

उपवन तलावाजवळ असलेला सत्यम लॉज बेकायदा असल्याने ते तोडण्यासाठी कर्मचा-यांनी सुरुवात केली. रस्त्याला लागून असलेला हा लॉज तीन मजल्यांचा होता. या कारवाई दरम्यान लॉजला तळघर असल्याचं अधिका-यांना आढळून आलं. यानंतर अधिका-यांनी बॅटरी हातात घेऊन तळघरात पोहोचले त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आलं. या लॉजखाली तब्बल २९० अनधिकृत खोल्या आढळल्या असून या खोल्यांमध्ये अवैध धंदे गेले अनेक दिवस सुरू होते. मात्र, या बाबत कुणालाच काहीही माहिती नव्हती.

Image courtesy: saamana
Image courtesy: saamana

ठाण्यातील येऊर परिसराजवळ असलेल्या या सत्यम लॉजवर कारवाई करत असताना मनपा अधिका-यांना त्या ठिकाणी दारुच्या बाटल्या आणि इतर साहित्य आढळून आलं. उपवन परिसरात असलेल्या या भागात इतकं मोठं बांधकाम झालं तरी कसं आणि याबाबत महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस यांना याबाबत काहीही कळले कसे नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.