नाशिक – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात सरकार बदल होऊन अडीच वर्षे झाली, मात्र काहीच बदललं नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. (उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

निवडणुकीपूर्वी काळा पैसा भारतात आणू, त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असं सांगितलं जात होतं, मात्र एकही पैसा आला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा केल्यास कर्जमाफीची मागणी मागे घेऊ, असं बोचरं वक्तव्यही उद्धव यांनी यावेळी केलं. शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शिवसेनेने नाशिक येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

“गाडीवरचा दिवा गेला पण यांच्या मनातला गेला नाही. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने तळपायाची आग मस्तकात गेली. आता शेतकरी रडणार नाही साल्यांची सालपटं काढतील”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राज्यव्यापी अभियानाची घोषणा केली. शिवसेनेचे अभियान हे 1 महिना चालणार आहे. शेतकरी कर्जमुक्त होणारच हा आमचा निर्धार आहे. शेतक-याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या अभियानात शिवसेनेचे मंत्रीही शिवसैनिक म्हणून उतरणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. (हे पण पाहा: सेनेच्या मेळाव्यात तो अस्थी घेऊन मंचावर आला आणि…)

मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिले आहे. समृद्धी तर सर्वांनाच हवी असते पण ही समृद्धी आणताना जे लोक थोड्याफार सुखात जगत आहेत त्यांच्यावर वरवंटा फिरवला जाणार असेल तर तोच वरवंटा आम्ही सरकारवर फिरवल्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.