मुंबई – जागतिक एड्सदिनानिमित्ताने ‘एड्समुक्त समाज’ निर्माण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करुया आणि एड्सला प्रतिबंध करुया असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा आयोजित ‘एचआयव्ही-एड्स जनजागृतीपर चित्रप्रदर्शना’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित हा उद्घाटन सोहळा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत झाला. या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थाचे प्रकल्प संचालक कमलाकर फंड, एनएचएमचे आयुक्त प्रदीप व्यास, आरोग्य संचालक सतीष पवार आदी उपस्थित होते. हे चित्र प्रदर्शन दि ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१६ पर्यंत सुरु असणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, चुकीच्या सवयी टाळणे व आरोग्याबाबत जागरूक असणे हे निरोगी जीवनासाठी आवश्यक असते. एड्सबद्दलचे गैरसमजही टाळले पाहिजेत. एड्सग्रस्तांना भेदभावाची वागणूक देता कामा नये. त्यांना समाजात सामावून घेतले पाहिजे. तसेच एड्सबद्दलचे गैरसमज दूर होण्यासाठी समाजात जाणीव जागृती झाली पाहिजे.

जागतिक एड्स दिनानिमित्ताने एडस् बाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात ‘चित्र प्रदर्शन’ चा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या चित्रप्रदर्शनात प्रामुख्याने एचआयव्ही आणि एडस् म्हणजे काय? एचआयव्ही संसर्गाचे मार्ग आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही एडस् कशाप्रकारे पसरतो, एचआयव्हीची तपासणी कधी करणे गरजेचे आहे, कोणत्या ठिकाणी तपासणी करावी, एडस् कशामुळे होत नाही, अशा विविध प्रश्न व उपायांवर आधारित चित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.