नैनिताल- माणसाने जंगले तोडली आणि जगंलातील प्राणी माणसांच्या घरापर्यंत येऊन पोहोचले. ही माणसाला अस्तित्वाची लढाई वाटल्याने माणूस प्राण्यांच्या जिवाशी खेळू लागला आहे. जगण्याचा अधिकार असलेल्या प्राण्यांची निघृण हत्या करुन मानवतेला काळीमा फासण्याचे प्रकार आजही सुरु आहेत. मग याला जंगलचा राजा असलेल्या वाघ तरी अपवाद कसा ठरेल??

वाघांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सकारात्मक संदेश देशभरातून मिळू लागले असताना दुसऱ्या बाजूला वाघाला चिरडून मारण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडिओ गेली अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेचा विषय असून संबधित आरोपी असलेले वनअधिकारी आणि गावकर्यांवर जोरदार टिका होत आहे.

त्याच झलं असं, जिम कॉर्बेट पार्कच्या ५ किमी अंतरावर, नैनितालजवळ एका वाघाने केलेल्या हल्ल्यात बाईचा मृत्यू झाला. आता त्या बाईच्या बॉडीचा ताबा मिळवण्यासाठी आलेल्या गावकरी मंडळीवर वाघाने परत हल्ला केला. त्यात त्या बाईचा सासरा वारला. हा प्रकार झाल्यावर वाघाला अद्दल घडविण्याचे सर्वांनी ठरविले.  वनअधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेने वाघाला पकडण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करण्याची सूचना केली. स्वत: ला प्रगत समजणाऱ्या माणसाने तंत्रज्ञानाचा (जेसीबी) वापर करुन वाघावर कशी मात केली हे या व्हिडिओमध्ये पाहता येईल. जेसीबीखाली वाघाला चिरडण्यासाठी बाकीचे मार्गदर्शन करीत आहेत. त्यानंतर या वाघाला जाळीमध्ये पकडण्याचा प्रयत्न जमावाने केला आहे.

हे प्रकरण सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरल्यावर वनधिकाऱ्यांचे धाबे दणाणाले. ते म्हणतात,  की वाघोबा जेसीबीमुळं नाही तर गुंगीचं औषध जास्त झाल्यामुळं दगावले. तिथे असलेल्यांपैकी एकालाही वाघाचे पुनर्वसन कसे करता येऊ शकेल याचा विचार मनात आला नाही हे दुर्देवच म्हणाव नाहीतर काय….??