ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफी भारत सहज जिंकणार अशा गप्पा सगळीकडे सुरु होत्या. भारतीय संघही जबरदस्त फॉर्मात असल्याने पाकला सहज धुळ चारणार असे वाटत होते. पण पाकिस्तानने भारताचे स्वप्न भंग केला . पण तो एक चेंडू नसता तर भारताने आज चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकली असती. पाकिस्तानी ओपनर फखर झमानने ११४ धावांची झुंझार खेळी खेळून पाकिस्तानची बाजू भक्कम बनवली. फखरने आपली पहिले शतकही ठोकले. मात्र य़ा शतकासाठी फखरला आपल्या नशिबालाही धन्यवाद द्यावे लागणार आहेत. याचे कारण म्हणजे डावाच्या सुरूवातीलाच फखरला जीवदान मिळाले हे.

जसप्रीत बुमराह आपले चौथे षटक घेऊन मैदानात उतरला. त्याने पहिलाच चेंडू वाईड फेकला. मात्र नंतरचा त्याचा उसळता चेंडू टोलवण्याचा मोह फखरला आवरता आला नाही. चेंडूने आपले काम केले. बॅटचा बाहेरच्या किनाऱ्याला चाटून चेंडू विकेटमागे धोनीच्या हातात विसावला. क्रिकेटप्रेमी भारतीयांमध्ये आनंदाची लाट उसळली.

बुमराहचा पाय क्रिझपासून पुढे

अंतिम सामन्यात लवकर विकेट मिळणे अत्यंत गरजेचे असते. पण हे काय, पंचाने फखरला बाहेर जाण्यापासून रोखले. रिप्लेत पाहिल्यानंतर बुमराहचा पाय क्रीझपासून पुढे होता हे दिसले. याचाच अर्थ की हा नो बॉल होता. परिणामी, फखरला जीवदान मिळाले आणि पाकिस्तान संघाला मोठा दिलासा. फखरला मिळालेले जीवदान हे पाकिस्तान संघाला संजीवनी देऊन गेला. यानंतर फखरने अझर अलीसोबत आपल्या टीमला उत्कृष्ट भागीदारीसह चांगल्या स्थितीत नेले. खेळामध्ये हारजीत ही होतच असते पण एका बॉलने भारतीय संघाला रुखरुख लागेल एवढ मात्र नक्की..