आयपीएलच्या दहाव्या मोसमातील 23वी मॅच कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्स या दोन टीम्समध्ये होत आहे. गुजरात लायन्सने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मैदानात बॅटींगसाठी आलेल्या कोलकाताच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 187 रन्स करत गुजरातच्या टीमसमोर विजयासाठी 188 रन्सचे आव्हान दिले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनिल नरेन याने धडाकेबाज बॅटींगची सुरुवात केली मात्र, नरेनेला मोठा स्कोर करता आला नाही. नरेनने 17 बॉल्समध्ये 9 फोर आणि 1 सिक्सर मारत 42 रन्सची खेळी खेळली. गौतम गंभीरनेही 28 बॉल्समध्ये 33 रन्स केले. त्यानंतर रॉबिन उथप्पाने धडाकेबाज बॅटींग करण्यास सुरुवात केली. उथप्पाने जम बसवत मोठा स्कोर उभा करण्यास सुरुवात केलीच होती मात्र, गुजरातच्या टीमने त्याला रोखले. रॉबिन उथप्पाने 48 बॉल्समध्ये 8 फोर आणि 2 सिक्सर मारत 72 रन्स केले.

गुजरातच्या टीमकडून प्रविण कुमार, फॉल्कनर, बसिल थम्पी आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. बसिल थम्पी याने टाकलेल्या 4 ओव्हर्समुळे गुजरातच्या टीमला काही प्रमाणात फटका बसल्याचं पहायला मिळालं.

कोलकाताच्या टीममध्ये एक बदल करण्यात आला असून शाकीब अल हसन याला संधी देण्यात आली आहे. तर, गुजरातच्या टीममध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून जेम्स फॉकनर आणि प्रवीण कुमार यांना गुजरातच्या टीममध्ये पुन्हा जागा मिळाली आहे.

आयपीएलच्या दहाव्या मोसमातील पॉईंट टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम 8 पॉईंट्स मिळवत दुस-या क्रमांकावर आहे. गुजरातसोबतची ही मॅच जिंकल्यास कोलकाताची टीम पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची शक्यता आहे. तर, गुजरातच्या टीमने आतापर्यंत झालेल्या 5 मॅचपैकी केवळ एकच मॅच जिंकली आहे त्यामुळे गुजरात लायन्स पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.