आयपीएलच्या 10व्या मोसमात क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये मुंबईने कोलकातावर विजय मिळवला आहे. कोलकाताच्या टीमने दिलेलं 108 रन्सचं आव्हान मुंबई इंडियन्सच्या टीमने 4 विकेट्स गमावत गाठलं आहे. या विजयासोबतच मुंबई इंडियन्सच्या टीमने फायनल गाठली असून आता मुंबई विरुद्ध पुणे अशी लढत पहायला मिळणार आहे.

कोलकाताने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबई इंडियन्सचा ओपनर बॅट्समन सिमन्स केवळ 3 रन्स करुन आऊट झाला. पार्थिव पटेलने 14 रन्स केले. यानंतर अंबाती रायडूने 6 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या टीमवर दबाव वाढत होता. मात्र, यानंतर आलेल्या रोहीत शर्मा आणि कृणाल पांड्या यांनी टीमला सावरलं. रोहीत शर्माने 24 बॉल्समध्ये 26 रन्स करुन आऊट झाला. तर कृणाल पांड्याने 28 बॉल्समध्ये 41 रन्स केले. यामुळे मुंबई इंडियन्सने कोलकातावार 6 विकेट्सने विजय मिळवला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमकडून पियुश चावलाने 4 ओव्हर्समध्ये 34 रन्स देत 2 विकेट्स घेतले. उमेश यादवने 2.3 ओव्हर्समध्ये 1 विकेट घेतला, तर निले यानेही 3 ओव्हर्समध्ये 1 विकेट घेतला.

मुंबई इंडियन्सच्या टीमने घेतलेला फिल्डींगचा निर्णय मुंबईच्या बॉलर्सने सार्थ ठरवल्याचं पहायला मिळालं. कोलकाता नाईट रायडर्सची अर्धी टीम 31 रन्सवर माघारी धाडण्यात मुंबईला यश आलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला 20 ओव्हर्सही संपूर्ण खेळता आल्या नाहीत आणि त्यांनी केवळ 107 रन्सपर्यंतच मजल मारली. (संबंधित बातमी: IPL 2017: मुंबई इंडियन्सला विजयासाठी 108 रन्सचे आव्हान)

मुंबई इंडियन्सच्या टीमकडून कर्ण शर्मा याने आपल्या जबरदस्त बॉलिंगच प्रदर्शन घडवलं. कर्ण शर्मा याने 4 ओव्हर्समध्ये केवळ 16 रन्स देत 4 विकेट्स घेतले. बुमराने 3 ओव्हर्समध्ये केवळ 2 रन्स देत 3 विकेट्स घेतले. तर जॉनसनने 4 ओव्हर्समध्ये 28 रन्स देत 2 विकेट्स घेतले.