मकाऊ: भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने मकाऊ ओपन स्पर्धेच्या दुस-या फेरीत जागा मिळवली आहे. महिला एकलच्या सलामीच्या सामन्यात सायनानं इंडोनेशियाच्या हाना रमादिनीवर २१-२३, २१-१४, २१-१८ असा दणदणीत विजय मिळवला. त्यासोबतच तिच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सायनानं हाना रमादिनीला एक तास आणि तीन मिनिटे टक्कर दिली. या सामन्यात हाना रमादिनीनं पहिला खेळ जिंकून सायनाला बॅकफूटवर धाडलं. मात्र, सायनानं जबरदस्त कमबॅक करुन पुढचे दोन्ही खेळ आपल्या नावावर केले. मकाऊ ओपनसाठी सायना नेहवालला अव्वल मानांकन देण्यात आलं आहे. दुसऱ्या फेरीत सायनासमोर इंडोनेशियाच्याच दिनार धाय आयुस्तिनचं आव्हान असेल.

सायनासोबतच भारताच्या पारूपल्ली कश्यप याचीही दमदार कामगिरी सुरु आहे. पारुपल्ली कश्यपनं चीन तैपेईच्या चुन वेई चेनचा २१-१९, २१-८ असा पराभव करुन मकाऊ ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. कश्यप गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीनं त्रस्त होता. पण चुन वेई चेनवर मिळवलेल्या विजयानं तो दुखापतीतून सावरल्याचं दाखवून दिलं. आता कश्यपला पुढच्या सामन्यात चीन तैपैईच्याच लीन यू हसईनचा सामना करायचा आहे.